Prakash Ambedkar News : ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत नेमका काय समझोता झाला आहे, हे त्यांनी उघड करावं,’ असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचाच घटक पक्ष आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून निवडणूक लढवावी’, अशी ऑफर खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यावर आंबेडकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
'अकोल्यातून कोणत्याही पक्षानं लढावं. तिथल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अकोल्याचा कुणी बाऊ करू नये. त्याऐवजी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्मुला नेमका काय ठरला आहे ते शिवसेनेनं जाहीर करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
'काँग्रेससोबत शिवसेनेची जागावाटपाची चर्चा झाली नसावी हे समजू शकतो. मात्र, राष्ट्रवादी सोबत त्यांचं काय ठरलं आहे हे त्यांनी सांगावं. आमच्यासोबत त्यांचं जागावाटप ठरलेलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेनेची युती झाली नाही तर अर्ध्या-अर्ध्या जागा लढण्याचं आमचं ठरलं आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी सोबत त्यांचं काय ठरलंय ते त्यांनी सांगावं. त्यांनी ही जबाबदारी आतापर्यंत पार का पाडली नाही, हे त्यांनी सांगावं, असं आंबेडकर म्हणाले.
इंडिया आघाडीतील जागावाटपासाठी दिल्लीत बैठक होत आहे. त्याचं आमंत्रण आलं आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिलं. आम्हाला कुणालाही त्या बैठकीचं आमंत्रण आलेलं नाही, असं आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी व पर्यायानं इंडिया आघाडीत स्थान मिळणार का याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्यास लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढणार, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी सोबत असावेत असं शिवसेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसलाही वाटत आहे. मात्र, जागांच्या अवास्तव मागणीमुळं हे पक्ष आंबेडकरांना सामावून घेण्याबाबत साशंक आहेत.