महाआघाडीसोबत जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले. यामुळे काही जागा अडचणीत येत असल्याचे दिसताच काँग्रेसकडून वंचितला महाविकास आघाडीत आणण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा नवी ऑफर दिली होती. पटोले म्हणाले होते की, आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. ज्या जागा त्यांना हव्या आहेत त्या जागा देखील देण्यास तयार असल्याचे पटोले म्हणाले होते. काँग्रेसच्या या नव्या ऑफरवर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना काँग्रेसचा वंचितला प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे असेच आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचिककडून राज्यातील उर्वरित मतदारसंघातील जागांचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमधील जागांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. याबाबत मी काँग्रेसला आधीच अवगत केले होते. मात्र काँग्रेसला राज्यात नेताच नसल्याने त्यांना निर्णय घेता आला नसल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे जिल्हापातळीवरील नेते स्वत:ला असुरक्षित मानत असून, भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेत आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले विदर्भात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पूर्व विदर्भात वंचितला पोषक वातावरण असून रामटेकमध्ये शिंदेंची शिवसेना व वंचितचे किशोर गजभिये यांच्यातच खरी लढत होत आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी ईव्हीममधील मतांसोबतच व्हीव्हीपॅटची मतेही मोजणीचा निर्णय सर्वेच्च न्यायालय देऊ शकते, असा अंदाजही प्रकाश आंबेडकरांनी वर्तवला. यावेळी सुजात आंबेडकरही उपस्थित होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद म्हटले की, "प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही पुन्हा एकत्र येण्यास तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पक्ष राज्यसभेत पाठवायला तयार आहे. यासोबट त्यांना केंद्रात मंत्रिपद देखील द्यायला तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा नवा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वेगळे लढण्याचा फायदा हा केवळ भाजपला होणार आहे. २०१९मध्ये देखील वंचितच्या भूमिकेमुळे काँग्रेसला फटका बसला होता. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या पाठिंब्या शिवाय निवडून येऊ शकत नाही. प्रकाश आंबेडकर हे आमचे मोठे बंधु असून, त्यांना राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला ते मान्यता देतील अशी अपेक्षा देखील अहमद यांनी व्यक्त केली.