Prakash Ambedkar on Nana Patole : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. भाजप, महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडीने आपआपले उमेदवार जाहीर केल्यावर आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि वंचितचे सूत न जुळल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहे. नाना पटोलेंचे भाजपशी छुपे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशोक चव्हाण आणि पटोले यांची मिलिभगत असून त्यामुळे त्यांनी नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या विरोधात कमकुवत उमेदवार दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेकर यांची रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी वरील आरोप केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, नाना पटोले यांच्या भुमिकांमुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही, तसेच काँग्रेस च्या वरिष्ठांनी पटोले यांच्या दुटप्पी भूमिकेची गांभीर दखल घ्यावी असे देखील आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, नाना पटोले यांची भूमिका ही संशयास्पद आहे. काँग्रेसने त्यांना भंडारा - गोंदिया या जागेवरून लोकसभा निवडणूक लढण्यास संगितले होते. मात्र, त्यांनी पक्षाचा आदेश मानला नाही. पटोले यांची ही भुमिका भाजपला मदत करणारी आहे. पटोले आणि अशोक चव्हाण यांची मिलिभगत असून यामुळेच नाना पटोले यांनी नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला नाही. आम्ही काँग्रेसला आम्ही सात जागांवर पाठिंबा दिला आहे. दिल्लीतिल नेत्यांनी इतर पाच जागांची यादी घोषित करावी त्यानंतर आम्ही देखील वंचित चा पाठिंबा घोषित करु असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर काहीही बोलायचं नसून याचे याचं उत्तर नाना पटोले देतील असे अशोक चव्हाण म्हणाले. हा काँग्रेसचा प्रश्न असून या बाबत त्यांनी बोलणे योग्य राहील असे देखील ते म्हणाले.