Narendra Modi Praful Patel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदावाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी देशभरातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप (Jiretop)घातला. मात्र ही कृती प्रफुल्ल पटेलांच्या (Praful Patel) चांगलीच अंगलटआली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती महाराष्टाचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा अवमान करणारी आहे, असा हल्लाबोल हिंदू महासभेने (Hindu Mahsabha)केला आहेत. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे इतकी लाचारी कुठून आली. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी उपस्थित केला आहे.
जिरेटोपावरून संभाजी ब्रिगेडनेही हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये. कोणत्याही कपड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप परिधान करणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान काही छत्रपती नाहीत. प्रफुल पटेलांना समजायला पाहिजे की, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो, असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून म्हटले आहे की, जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!
शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही ट्विट करत पटेलांवर निशाणा साधला आहे. जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की,' प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे.... अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे, अशी जहरी टीका जगताप यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह NDA चे नेते वाराणसीत उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातून टीकेची झोड उठली आहे.
संबंधित बातम्या