मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Praful Patel : नरेंद्र मोदी यांना शिवरायांचा जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना चूक कळली! म्हणाले...

Praful Patel : नरेंद्र मोदी यांना शिवरायांचा जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना चूक कळली! म्हणाले...

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 15, 2024 06:10 PM IST

Praful Patel clarification on Jiretop Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घालणाऱ्या प्रफुल पटेल यांनी आपली चूक मान्य केली आहे.

नरेंद्र मोदी यांना शिवरायांचा जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल पटेल यांना चूक कळली! म्हणाले...
नरेंद्र मोदी यांना शिवरायांचा जिरेटोप घालणाऱ्या प्रफुल पटेल यांना चूक कळली! म्हणाले...

Praful Patel on Jiretop Controversy : छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर चढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अखेर चूक कळली आहे. पटेल यानी या संदर्भात ट्वीट केलं आहे. भविष्यात काळजी घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या मित्र पक्षाचे नेते वाराणसीला गेले होते. अजित पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून प्रफुल्ल पटेलही तिथं गेले होते. मोदींची भेट घेतल्यानंतर पटेल यांनी आपल्याकडील जिरेटोप त्यांच्या डोक्यावर ठेवला. हे दृश्य वाऱ्यासारखं व्हायरल झालं आणि महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली.

विरोधातील राजकीय पक्षांसह मराठा संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सत्ताधारी भाजप व त्यांच्या मित्र पक्षावर टीकेची झोड उठवली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष रोजच्या रोज महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तर, प्रफुल्ल पटेल यांना यातून कोणता संदेश द्यायचा आहे, असा सवाल संभाजी ब्रिगेडनं केला.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही प्रफुल्ल पटेल यांना घेरलं. 'महायुती दिल्लीच्या तख्तापुढं इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, असा हल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चढवला.

वातावरण चिघळल्याचं दिसताच प्रफुल्ल पटेल यांनी आज ‘एक्स’वर पोस्ट करून त्यांची भूमिका मांडली. ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढं काळजी घेऊ,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे जिरेटोपाचं महत्त्व?

‘जिरेटोप’ ही शिवकालीन पगडी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा जिरेटोप डोक्यावर घालत असत. अलीकडच्या काळात एखाद्या व्यक्तीला जिरेटोप भेट दिला जातो. मात्र ही भेट देताना जिरेटोप त्याच्या हातात दिला जातो. थेट डोक्यावर ठेवला जात नाही. प्रफुल्ल पटेल यांनी हा जिरेटोप मोदींच्या हाती देण्याऐवजी डोक्यावर ठेवला. त्यामुळं वाद निर्माण झाला. पटेल यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

IPL_Entry_Point