महाराष्ट्राची सत्ता १६९ कुटुंबाच्या हातात; ठाकरेंसमोर प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला
Shiv Sena-Vanchit Alliance : निवडणुकीतील उमेदवारांचं सामाजिकीकरण करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती केल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
Prakash Ambedkar on vanchit bahujan aaghadi and shivsena alliance : आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रात युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. त्यामुळं आता सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. परंतु आता युतीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील सत्ता केवळ १६९ कुटुबांच्या हातात असल्याचं सांगत ठाकरेंसमोर काँग्रेससह राष्ट्रवादी आणि भाजपला जोरदार टोला हाणला आहे. याशिवाय निवडणुकीत उमेदवारांचं सामाजिकीकरण करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
निवडणुकीत उमेदवारांना जिंकवणं हे राजकीय पक्षांना नाही तर मतदारांच्या हातात आहे. फक्त उमेदवारी देणं हे राजकीय पक्षांच्या हातात आहे. महाराष्ट्रातील सत्ता ही १६९ कुटुंबियांच्या हातात असताना आता त्यात आणखी १० कुटुंबियांची भर पडली आहे. परिणामी नात्यागोत्यांचं राजकारण वाढल्यामुळं गरिबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. राज्यातील सत्ता ही मोजक्या घराण्यांची आणि लुटारू भांडवलदारांची असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अनेक नेते घराणेशाहीतून पुढे आलेले असल्यानं आंबेडकरांनी ठाकरेंसहित सर्वच पक्षांवर प्रहार केल्यामुळं राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आल्यामुळं बदलाच्या सकारात्मक राजकारणाला सुरुवात होणार आहे. जेव्हा राजकीय पक्ष सामाजिक प्रश्नात हात घालतात तेव्हा समाजव्यवस्थेतील गणितंही बदलत असतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आणि उपेक्षितांचं राजकारण सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या प्रयत्नांना इतर पक्षांनी नेहमीच गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या दबावाला बळी न पडता आम्ही नेहमीच लढा दिला, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.