Powai Womans Death From 11th Floor: मुंबईतील पवई येथील कार्यालयाच्या अकराव्या मजल्यावरीलआपत्कालीन खिडकीतून पडून एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आपत्कालीन खिडकीचे कुलूप उघडे ठेवण्यात आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना होत नसल्याने व्होरा यांच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जिनल व्होरा, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जिनल व्होरा ही न्यूयॉर्कमधील इन्शुरन्स फर्म मार्श अँड मॅकलेननची कर्मचारी होती. दरम्यान, ९ जानेवारी जिनल व्होरा ११ मजल्यावरील आपत्कालीन खिडकीजवळ चहा पिताना तिचा तोल गेला आणि ती दहाव्या मजल्यावरील गार्डन परिसरात पडली. या घटनेत व्होराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तिला हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेत व्होरा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
व्होराचा भाऊ वैभव व्होरा याने सीसीटीव्हीचा अभाव आणि सुरक्षेच्या अपुऱ्या नियमांचे कारण देत कंपनीकडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. आपत्कालीन खिडकीला कुलूप लावण्यात आले नव्हते आणि अशी घटना कशी घडू शकते? हे एक गूढ आहे. एकाही मजल्यावर सीसीटीव्ही नाहीत, ही सुरक्षेतील मोठी त्रुटी आहे. भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी कंपनीने सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी त्यांनी मागणी केली.
व्होरा यांचे पती वकील सिद्धार्थ कक्का यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वी आम्ही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. ती हुशार विद्यार्थिनी होती आणि खूप उत्साही आणि महत्त्वाकांक्षी होती. ती बेशुद्ध झाली असा मला फोन आला. तिला इतकी गंभीर दुखापत झाली, याची मला कल्पना नव्हती. त्या दिवशी दुपारी तीन वाजता आम्ही बोललो. जिनल माझा सर्वात मजबूत आधारस्तंभ होता, तिच्याशिवाय, संपूर्ण आयुष्य एकट्याने जगणे, माझ्यासाठी आव्हान असेल. कंपनीने खिडकीच्या लॉककडे लक्ष द्यायला हवे होते. मी एक समस्या सोडवणारा भागीदार गमावला आहे, ज्याने मला खूप पाठिंबा दिला, असेही कक्का म्हणाला.
बोरिवली पूर्वयेथील रहिवासी जिनल व्होरा २०२४ मध्ये मार्श आणि मॅकलेनन मध्ये सामील झाली. मालाडच्या एमकेईएस कॉलेजमध्ये ती कायद्याची तिसरी पदवी घेत होती आणि यापूर्वी तिने बँकिंग आणि इन्शुरन्स तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये पदवी पूर्ण केली होती. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि सुरक्षित पायाभूत सुविधा सुनिश्चित करणे यासह कर्मचार् यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती व्होरा यांच्या कुटुंबांनी कंपनीला केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
संबंधित बातम्या