बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाण्यासह बदलापुरात देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स झळकले होते. त्यावर पिस्तुलधारी फडणवीस यांच्या फोटोसह 'बदला पुरा' असं लिहिण्यात आलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात आज पोलिसांसह सरकारला फटकारल्यानंतर हे पोस्टर्स तात्काळ उतरवण्यात आले.
अक्षय शिंदे यांच्या कथित एन्काऊंटरवरून राज्यात सध्या संशयकल्लोळ माजला आहे. विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. तसंच, सरकारलाही धारेवर धरलं आहे. न्याय हा कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा होता असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची भूमिका सरकारनं घेतली आहे.
असं असताना अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरनंतर मुंबई, ठाणे व बदलापुरात काही पोस्टर्स झळकले होते. या पोस्टर्सवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंदूक घेतलेला फोटो होता. बाजूला ठळक अक्षरात 'बदला पुरा' असं लिहिण्यात आलं होतं. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरचं निमित्त करून फडणवीस यांना श्रेय देण्याचा हा प्रयत्न होता.
अक्षय शिंदेच्या कुटुंबानं पोलिसांच्या कारवाई विरोधात केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयानं देखील या एन्काऊंटवर अविश्वास व्यक्त केला. जे झालं त्यावर विश्वास बसणं कठीण आहे. चार पोलीस आवरू शकत नाहीत इतका अक्षय शिंदे मजबूत होता का? स्वसंरक्षणार्थ गोळी कुठं झाडायची असते हे पोलिसांना कळत नव्हतं का? असे अनेक प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले. त्यावेळी न्यायालयात फडणवीसांच्या पोस्टर्सचाही उल्लेख झाला.
'शहरात काही पोस्टर्स लागल्याचं आमच्या निदर्शनास आलंय. देवा भाऊंनी न्याय केला वगैरे… देवाभाऊ न्याय करत असतील तर इथं कशाला आलात, अशा शब्दांत न्यायालयानं संबंधितांना झापलं. कोर्टाच्या या संतापानंतर काही वेळातच फडणवीसांचे ते वादग्रस्त पोस्टर्स उतरवण्यात आले.