Weather Update : पुढील३ते४तासात कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडाआणि विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (unseasonal rain in Maharashtra) वर्तवली आहे.
मुंबई हवामान विभागाने बुधवारी सायंकाळी ७ वाजता वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगली,सोलापूर, अहमदनगर छ. संभाजीनगर,जालना,बीड,लातूर,धाराशिव, परभणी आणि पुणे जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. येथे ४०-५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यालारणरणत्या उन्हापासून थोडा दिलासा मिळाला. आजा कोल्हापूर सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ,हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
पुढील २ दिवसात मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला असून आकाश अंशतः ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७ व २७ अंश सेल्सिअसच्याआसपास असेल. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहाणार आहे. प्रतितास३०-४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.