पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेतील आरोपी असलेल्या १७ वर्षीय मुलाच्या रक्ताचे नमुने बाजुला काढून त्याच्या जागी दुसऱ्याचे नमुने घेण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुणे पोलिसांनी सोमवारी दिली. ससून सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांना असे करण्यासाठी आरोपी मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना मोठ्या रक्कमेचं आमिष दाखवले होते, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले असल्याने रुग्णालयाकडून रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात अल्कोहोलचे कोणतेही अंश आढळले नाहीत.
पुण्यातील कल्याणी नगर भागात १९ मे रोजी पहाटे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने चालवलेल्या पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन आयटी व्यावसायिकांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी असा दावा केला आहे की, आरोपी मद्यधुंद होता.
मात्र आज रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले नाही. पोलिसांनी ससून सामान्य रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी डॉ. तावरे यांना अनेकदा फोन करून नमुने बदलण्याच्या सूचना दिल्या. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनीच डॉ. अजय तावरे यांना फोन करून रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मोठ्या रक्कमेचे आमिष दाखविले होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.
पुरेशी खबरदारी म्हणून पोलिसांनी डीएनए सॅम्पलिंगसाठी अल्पवयीन मुलाचा आणखी एक नमुना घेतला होता आणि तो दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आला होता. ससून रुग्णालयातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या अहवालात फेरफार करण्यात आल्याचे दुसऱ्या रुग्णालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले. तसेच दोन्ही अहवालांचे डीएनए जुळत नसल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपीचे आणखी नमुने घेतले असतील, याची दोन्ही डॉक्टरांना कल्पना नव्हती.
अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी कोणाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले, याचा तपास सुरू आहे. ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असे कुमार यांनी सांगितले.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील असलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. आरोपीचे वडील विशाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला बंदी बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी पैसे देऊन आणि धमक्या देऊन अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
संबंधित बातम्या