Pune metro inauguration politics : बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आणखी गुरुवारी अतिवृष्टीच्या अंदाजामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. यामुळे बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटनदेखील रद्द करण्यात आले. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीयांच्यात मेट्रो उद्घाटनावरून चांगलेच राजकारण तापले आहे. आज महाविकास आघाडीतर्फे सकाळी ११ वाजता मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी मेट्रो सेवा सुरू करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे.
यावरून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. घाटे म्हणाले, पंतप्रधान अशा कार्यक्रमांसाठी पुण्याला येतात, हा आमचा सन्मान आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याची मोदींची परंपरा आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर टीका कशी करायची व राजकारण कसं करायचं हे विरोधकांनाच माहित आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने हा मेट्रो मार्ग विनाविलंब सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, मेट्रो जनतेसाठी आहे. ती तयार असेल तर ती कार्यान्वित व्हायला हवी. गरज पडल्यास शुक्रवारी आम्ही स्वत: त्याचे उद्घाटन करू. हा मेट्रो मार्ग सुरू करण्यात यावा यासाठी आज सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर निदर्शने करण्यात येणार आहे असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.
या बाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रखडले आहे. पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो मर्गिकेचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय ही भीती पुणेकरांना सतावत आहे.
ज नतेचा पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गीका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. त्यामुळे आज शुक्रवारी (दि २७) सकाळी ११ वाजता या मर्गिकेचे महाविकास आघाडीच्या वतीने लोकार्पण करण्यात येणार आहे.