Maratha Reservation : मराठ्यांना तातडीने आरक्षण द्या अन्यथा... राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठ्यांना तातडीने आरक्षण द्या अन्यथा... राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी

Maratha Reservation : मराठ्यांना तातडीने आरक्षण द्या अन्यथा... राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी

Oct 26, 2023 06:33 PM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

Maratha Reservation Protest Sambhajinagar
Maratha Reservation Protest Sambhajinagar (HT)

Maratha Reservation Protest Sambhajinagar : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन आता जोर धरताना दिसून येत आहे. प्रमुख आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून जालन्यातील आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यानंतर आता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, कन्नड आणि गंगापूर तालुक्यातील शेकडो गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी लागू करण्यात आल्याचे बॅनर लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील अगर कानडगावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. मराठा संघटना आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी जारी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, अन्यथा त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असाही इशारा मराठा संघटनांकडून देण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील कानडगाव, बगडी, नवाबपूर, नेवरगाव, बाबरगाव आणि शिंगी या गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. यावेळी मराठा आंदोलकांकडून मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहे. कानडगावसह भेंडाळा, वाळूज, टेंभापूरी, माळवाडी, कोळघर, वरखेड, दिनवाडा, माळीवाडगाव, भिवधानोरा, सिरजगाव, घोडेगाव, पिंपरी, मालुंजा आणि मांगेगाव या गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशीव आणि परभणी या जिल्ह्यांतील शेकडो गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत असल्याचे बॅनर लावण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या