महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या, गुरुवारी शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ‘मी परत येणार, मी परत येणार’ ही घोषणा चांगलीच प्रसिद्ध झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना मुख्यमंत्रीपदी परत येण्याचे आश्वासन देत खालील हिंदी दोहे बोलून दाखवले होते.
"मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बसा लेना,
मैं समंदर हूं, लौट कर वापिस आउंगा
विरोधी पक्षनेतेपदाचा काळ फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वाधिक अडचणीचा होता. 'परत येणार, परत येणार' वरून तत्कालीन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांनी फडणवीस यांची अनेकदा खिल्लीही उडवली होती.
आज फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांचा मुख्यमंत्रीपदासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीस हे ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचं वय ४४ होतं. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात ते दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर ते ८० तासांसाठी पुन्हा मुख्यमंत्री बनले. परंतु तेव्हा अजित पवार यांनी त्यांचा पाठिंबा मागे घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ३० जून २०२२ पासून ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द १९९२ मध्ये नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरू झाली. १९९७ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले होते.
देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरआरएस) सदस्य आहेत.
फडणवीस यांनी १९९९ मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून जिंकली होती. त्यानंतर २००९ साली ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार झाले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपला सर्वाधिक १३२ जागा जिंकल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, हे निकालाच्या दिवशी जवळपास निश्चित झाले होते. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४१ जागा मिळाल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपच्या १०५ जागा निवडून आल्या होत्या.
२०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने युतीमधून वेगळे होत वेगळी वाट धरली होती. त्यामुळे फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. त्यामुळे फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पर्यायी आघाडी बनवून २३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकले नाही. फडणवीस यांना २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले होते.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंड झाले. या बंडानंतर फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नाईलाजाने का होईना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या फडणवीसांसाठी उपमुख्यमंत्रीपद म्हणजे डिमोशन असल्याचे अनेकांनी म्हटले होते. पण याच निर्णयामुळे फडणवीस आणि भाजपला नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १३२ जागा मिळवून देण्यात मदत झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
मे २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा जनाधार कमी झाला होता. भाजपने लढलेल्या २८ जागांपैकी केवळ ९ जागा जिंकल्या होत्या. तर २०१९ लकसभेत भाजपने लढलेल्या २५ पैकी २३ जागा निवडून आल्या होत्या. दरम्यान, त्यानंतर फडणवीस यांची दिल्लीत बदली होऊ शकते, असं बोललं जात होतं.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुरात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील, दिवंगत गंगाधर फडणवीस हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार होते. आई सरिता फडणवीस यांनी विदर्भ हाऊसिंग क्रेडिट सोसायटीच्या माजी संचालक म्हणून काम केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना देवेंद्र फडणवीस हे भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य होते.
आणीबाणीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांना राजकीय कैदी म्हणून तुरुंगात डांबण्यात आले होते. ते जनसंघाचे सदस्य होते आणि सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे तुरुंगात पाठवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठाच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी आणि जर्मनीतील डीएसई-जर्मन फाऊंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ५ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये ५६ लाख रुपयांची जंगम आणि ४.६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सुमारे ७ कोटी ९० लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यात ६ कोटी ९० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ९५ लाख रुपयाच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फडणवीस दाम्पत्याची एकूण संपत्ती सुमारे १३ कोटी रुपये आहे. फडणवीस यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३८.७ लाख रुपये आणि २०२२-२३ या वर्षात ३८.६ लाख रुपये वार्षिक उत्पन्न जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या