“पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.!', पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल-police washing car of mla sanjay gaikwad congress leader harshwardhan sapkal shares video ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.!', पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल

“पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.!', पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल

Aug 29, 2024 05:13 PM IST

Police washing car MLA : एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सपकाळ यांनी पोस्ट करत पोलिसांचं काम जनतेच्या सुरक्षेचं आहे की आमदरांच्या गाड्या धुण्याचं? असा सवालही उपस्थित केला आहे.

पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल
पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल

मालवणमधील राजकोट परिसरात ठाकरे व राणे समर्थकांमध्ये जोरदार धमश्चक्री झाली. यानंतर नितेश राणे पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाताना तसेच नारायण राणे पोलिसांना काहीबाही सुनावत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. पोलिसांच्या हतबलचे हे प्रकरण ताजे असतानाच आता बुलढाण्यातूनही तसाच प्रकार समोर आला आहे. एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरुन शेअर केला आहे.

संजय गायकवाड शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार आहेत. बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच पोलिस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सपकाळ यांनी पोस्ट करत पोलिसांचं काम जनतेच्या सुरक्षेचं आहे की आमदरांच्या गाड्या धुण्याचं? असा सवालही उपस्थित केला आहे.

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसते की, एक पोलीस कर्मचारी आमदार कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर पाणी मारत धुताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा कर्मचारी यावेळी वर्दीत आहे. म्हणजेच कर्तव्यावर असताना तो आमदाराची गाडी धुण्याचे काम करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? अशी विचारणा केली आहे. तसंच पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिलं आहे की, “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र  माझा महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे,की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का?आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . ! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,"अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.