Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना आर्थिक मदत करण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, मला या विषयावर अधिक बोलायचे आहे. परंतु, यामुळे माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नुकसान होईल, म्हणून तसे करणे टाळत आहेत.
शिंदे गटाकडून नाशिकच्या उमेदवारांना विमानाने एबी फॉर्म पाठवण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार म्हणाले की, 'आम्ही अनेक जिल्ह्यांमधून ऐकत आहोत, काही अधिकाऱ्यांकडून ऐकत आहोत की, सत्ताधारी पक्षातील उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी पोलीस वाहनांचा वापर केला जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. परंतु, माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्याने नाव जाहीर करू नये, अशी गळ घातली आहे.' दरम्यान, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती असती तर मी वाटेल ते केले असते. परंतु, मी पूर्ण माहितीशिवाय भाष्य करत नाही.'
दरम्यान, महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला विधानसभेसाठी एकाच टप्पात मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करत आहे. तर, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात २०१९ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी एनडीएच्या सरकारने सर्वाधिक जागा जिंकल्या. परंतु, नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले. यावेळी भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. तर, शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. युती सत्तेत राहण्याच्या तयारीत होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असताना ही युती तुटली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अजित पवार यांच्यासोबत हात मिळवून सरकार स्थापन करून सर्वांना चकित केले. परंतु, हे सरकार फक्त तीन दिवसानंतर लगेच कोसळले. त्यानंतर अजित पवार पुन्हा आपल्या पक्षात परतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार जून २०२२ पर्यंत टिकले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ते पाडले. शिंदे यांनी शिवसेना तोडून भाजपशी हातमिळवणी करून महायुतीचे सरकार स्थापन केले. पुढे, अजित पवार यांनी देखील शरद पवारांविरोधात बंड पुकारून आपल्या समर्थकांसह सत्तेत सामील झाले.