Pune Sinhgad road Crime : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. रोज मारहाण, खून, दरोडे, फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. आता पुण्याला सुरक्षित ठेवणारे पोलिस देखील असुरक्षित असल्याचं गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. पुण्यात फरासखाना येथे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई करत असतांना एका महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता, सिंहगड रोड येथे वाहतुकीचे नियोजन करत असणाऱ्या पोलिसांनी दोघांना हटकल्याने त्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी अशी त्यांची नावे आहेत.
पुण्यात ड्रग्स तस्करी, हीट अँड रन, कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या सर्वांवर पुणे पोलिस रोज काही ना काही कारवाई करत असतात. त्यामुळे पोलिसांची दहशत अजूनही सामान्य नागरिकांच्या मनात कायम आहे. मात्र, आता थेट पोलीसांवरच हल्ले होऊ लागल्याने पोलिसांची भीती गुन्हेगारांना उरली नसल्याचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. पूर्वी पोलिस म्हटले की सर्वसामान्य नागरिकांसोबतच गुन्हेगारांना देखील धडकी भरायची. मात्र, याच गुन्हेगारांची मजल आता पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत केली आहे. फरासखाना येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतांना सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलीस अंमलदाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोल्हेवाडी फाटा येथे वाहतुकीचे नियोजन करत असणाऱ्या पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांनी दोघांना त्यांच्या गाड्या बाजूला घेण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या मंगेश फडके आणि रोहिदास दळवी यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी कोण आहे? तुला माहीत नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, असं म्हणत दोघांननी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड धमकावत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गायकवाड यांच्या मदतीसाठी गेलेले दुसरे पोलिस कर्मचारी यांना देखील आरोपींनी मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या