Police Recruitment: राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असून अनेक जिल्ह्यात भरती सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून पोलीस भरती अंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान नवी मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेला गालबोट लागले असून पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराचा भरतीदरम्यान मृत्यू झाला आहे. राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी जळगावहून नवी मुंबईत आलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे, याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये ही घटना घडली. अक्षय बिऱ्हाडे (२३ वर्षे) असं या तरुणांचं नाव आहे. भरती प्रक्रियेच्या दरम्यान तो मैदानातच कोसळला होता.
पोलीस भरतीसाठी अक्षय बिऱ्हाडे हा जळगावचा तरुण सहभागी झाला होता. अक्षय मूळचा जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचा रहिवासी होता. एसआरपी भरती ग्रुप क्रमांक११या ठिकाणी मैदानावर धावत असताना तो मैदानातच कोसळला. त्याला बेशुद्ध अवस्थेतचकळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अक्षय ५०० मीटर धावण्याचा टप्पा पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत, असा आरोप नातेवाईंकांनी केला आहे. अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्यांने काही सेवन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अक्षय बिऱ्हाडे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस भरतीदरम्यान नवी मुंबईत एकाचा मृत्यू झाला असून आणखी सहा जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांवरही कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू केले जात आहेत. एक जण गंभीर असल्याची माहिती माहिती ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. प्रेम ठाकरे (२९ वर्षे) असे गंभीर असलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्रकृती बिघडलेल्या सहापैकी एकाची तब्येत सुधारली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अमित गायकवाड याला डिस्चार्ज मिळाला आहे. त्याचबरोबर पवन शिंदे, अभिषेक शेटे, सुमित अडतकर, साहील लवान या तरुणांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या