Pune Police action against Pub : पुणे पोलिसांनी पुण्यातील पब चालकांवर फास आवळला आहे. दीड वाजेपर्यंत हॉटेल, बार पब सुरू ठेवण्याची परवानगी असतांना देखील या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कल्याणी नगर येथील युनिकॉर्न हाऊस (Unicorn House) व एलरो या पबवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने काल रात्री कारवाई करत २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), अमन इदा शेख (वय ३०, रा. विकास नगर, लोहगाव), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी (रा. लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अमेय अनिल रसाळ यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी नगर येथील सेरेब्रह्म आयटी पार्क बी इमारतीच्या ८ मजल्यावर एलरो नावाचे रुफ टॉप हॉटेल आणि पब आहे. हे पब आणि हॉटेल सोमवारी रात्री दीड ते सकाळी पावणे सहा दरम्यान सुरू होता. तसेच या ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यानुसार या पबवर पोलिसांनी कारवाई केली तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ ही पब आणि हॉटेल सुरू ठेऊन मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम वाजवण्यात आल्याने, त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, साऊंड सिस्टिम, हुक्का पॉट तसेच इतर मिळून २९ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब, हॉटेल, रूफ टॉप हॉटेल, बार यांना केवळ दीड वाजेपर्यंत सुरू राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, असे असतांनाही या नियमाची पायमल्ली करून तसेच आजूबाजू असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्रास झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या हॉटेल मधून १७ लाख किमतीची साऊंड सिस्टिम, साऊंड स्पीकर, कन्सोल, लाईट कंट्रोलर आदि साहित्य जप्त केले आहे.
तर दुसऱ्या तक्रारीत पोलीस शिपाई संदीप खंडू कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे, प्रफुल्ल बाळासाहेब गोरे, रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी यांच्यावर आणखी एक दूसरा गुन्हा दाखल करण्यात आला.कल्याणी नगर येथील सेरेब्रह्म आयटी पार्क इमारतीच्या ८ व्या मजल्यावरच हॉटेल युनिकॉन हाऊस नव्याचा दुसऱ्या एका पबवर ही कारवाई करण्यात आली. हा पब रात्री १.३० ते पहाटे ६ सुरू होता. तसेच या ठिकाणी साऊंड सिस्टिम देखील सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत येथील ७ लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही गुन्ह्यांचे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत य पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे करीत आहेत.