Walchandnagar Crime : पुणे शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी वाढली आहे. इंदापूर येथे दरोड्याचया तयारीत असलेल्या एका टोळीच्या मुसक्या पुणे ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत. या कारवाईत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. ९ सुतळी बॉम्ब, ३ पिस्टल व तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ असं आरोपीचे नाव असून तो अट्टल गुन्हेगार आहे. एवढ्या मोठा शस्त्रसाठा सापडल्याने पोलिस देखील चक्रावले आहे. दरोडेखोर मोठ्या दरोड्याच्या तयारीत होते. वालचंदनगर पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते. तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक ०१ येथील कामगार वसाहतीच्या एका खोलीत त्याच्या मित्रांसोबत लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार वालचंदनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. यानंतर धाड टाकत त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, मॅग्झीन, १० जिवंत काडतुसे (राऊंड), १४ मोबाईल, २ लोखंडी कटर, १ लोखंडी तलवार, २ लोखंडी चाकू, १ मुठ नसलेले तलवारीचे पाते व ९ सुतळी बॉम्ब असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे, इंदापूर तालुक्यात मोठ्या दरोड्याचया तयारीत आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे.