Pune Airport : रेल्वे प्रवासात अनेकजण विनातिकीट प्रवास करत असतात. अनेकदा त्यांच्याकडून रेल्वे प्रशसानाकडून मोठा दंड देखील वसूल केला जातो. मात्र, आता विमानातून देखील फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न पुढे आला आहे. ही घटना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पुणे विमानतळ राज्यातील मोठे विमानतळ आहे. येथून देशांतर्गत आणि काही परदेशी विमाने उड्डाण करत असतात. दरम्यान, आज या विमानतळावर आज एक धक्कादायक घटना घडली आहे. बनावट टिकीटांच्या आधारावर दोघांनी थेट विमानातून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. या पूर्वी पुणे विमानतळावर ड्रग्स आणि सोने चांदीच्या तस्करी सोबतच इतर मौल्यवाण वस्तूंची देखील तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे सोने व तस्करी करून आणलेला माल जप्त केला आहे. अशातच आज झालेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. सलीम खान व नसीरुद्दीन खान अशी आरोपींची नावे आहेत. विमानतळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान व नसीरुद्दीन खान या दोघांननी इंडिगो एयर लाइनचे बनावट तिकिट तयार केले होते. या तिकीटाच्या मदतीने हे इंडिगोच्या विमानाने उड्डाण करून लखनऊला जाणार होते. या साठी त्यांनी हे बनावट तिकीट दाखवून त्यांनी विमानतळाच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. विमानतळवरील सुरक्षा प्रणालितून जात असतांना एअरपोर्ट अधिकाऱ्यांना त्यांच तिकीट हे बनावट असल्याचं आढळलं. या प्रकरणी त्यांनी विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना माहिती देत त्यांना तातडीने अटक करण्यास सांगितली. यानंतर त्यांना विमानतळ पोलिसांकडे देण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विमानतळ पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी काही घातपात व दहशतवादी कृत्याचा सहभाग आहे का? या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत. बनावट तिकीट घेऊन उड्डाण करण्यामागील त्यांचा हेतू काय होता, या प्रकरणी पुणे पोलिसांनी काही माहिती दिलेली नाही. सध्या दोघांची चौकशी केली जात आहे.