Nagpur Crime News : पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार
Nagpur Crime News : आरोपी पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्सची विक्री करत होते, परंतु या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तस्करांचा भांडाफोड केला आहे.
Nagpur Crime News Marathi : संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळं आता नागपुरातील ड्रग्ज तस्करांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील यशोधरानगर परिसरात रात्री उशिरा पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी शोएब खान जफर खान आणि सलीम शहा अयुब शहा हे एक बॅग घेवून निर्जनस्थळी थांबल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना हटकलं असता आरोपींना घटनास्थळावरून पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीनं दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त केलं आहे. शहरातील एका पबमध्ये या ड्रग्सची विक्री केली जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यामुळं आता नागपुरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूर शहरातील वेगवेगळ्या पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना आरोपींमार्फत ड्रग्सचा पुरवठा केला जात होता. याशिवाय केवळ दोनच आरोपी नाही तर आरोपींची एक साखळीच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचे व्यवहार केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी व विक्रीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच नागपुरात अवैध विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता ड्रग्जची विक्री करणाऱ्या तस्कराचा भांडाफोड करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.