Palghar Crime News : तरुणींचे फोटो चोरून अश्लील व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून सख्ख्या भावांना बेड्या
Palghar Crime News : इन्स्टाग्रामवरील तरुणींचे फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ तयार करत त्याला व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Palghar Crime News Marathi : इन्स्टाग्रामवरून चोरलेल्या फोटोंना मॉर्फ करून त्याचे अश्लील व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेच्या कळंब या गावात ही घटना घडली आहे. त्यामुळं आता पालघरमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींनी अनेक मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित तरुणींना कळताच त्यांनी आरोपींना जाब विचारला. परंतु आरोपींना मुलींनाच मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील कळंब या गावात राहणाऱ्या यश आणि जीत निजाई या दोन भावंडांनी परिसरातील तरुणींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटोंची चोरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी तरुणींच्या फोटोंना मॉर्फ करत त्याचे अश्लील व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. याशिवाय आरोपींनी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल केले. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणींनी आरोपींना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी तरुणींना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणींनी थेट पोलीस ठाणे गाठत पोलिसांना घडलेला सारा प्रकार सांगितला.
तरुणींचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने कळंब गावात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं नालासोपारा पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आरोपींनी तरुणींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर कळंब गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत स्थिती नियंत्रणात आणली आहे.