नागपुरातील एका धर्माच्या पवित्र ग्रंथाचे दहन केल्याच्या अफवेमुळे सोमवारी रात्री हिंसाचार उफाळला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने नागपूर शहरात अनेक भागात संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली आणि शांतीनगर या पोलिस ठाण्यांचा हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपुरात नुकताच झालेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हिंसाचाराला जबाबदार असलेले स्थानिक नसून जातीय सलोख्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात अशांतता निर्माण करण्यासाठी आलेले बाहेरचे लोक असल्याचा दावा प्यारे खान यांनी केला आहे.
‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संतांसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरात असा हिंसाचार व्हायला नको होता. रामनवमीच्या काळात येथील मुस्लिम हिंदूंच्या स्वागतासाठी तंबू लावतात. एक दर्गा आहे जिथे हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे लोक प्रार्थना करण्यासाठी येतात’, असं प्यारे खान यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. शहराबाहेरून आलेल्या असामाजिक घटकांमुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ‘या हिंसाचारात सहभागी असलेले लोक नागपूरचे नाहीत. काही असामाजिक घटक बाहेरून आले आणि त्यांनी अशांतता निर्माण केली.’ असं प्यारे खान म्हणाले.
औरंगजेबाची समाधी हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांनी सोमवारी नागपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान एका धर्माचे पवित्र ग्रंथ जाळण्यात आल्याच्या अफवेनंतर मध्य नागपुरातील महाल येथील चिटणीस पार्क परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जमावाकडून जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. महाल परिसरातील विविध भागात सोमवारी उशिरा रात्री पोलिसांनी धरपकड केली. या दरम्यान पोलिसांनी १५ जणांना अटक केली.
दरम्यान, जुना भंडारा रोडजवळील हंसापुरी परिसरात रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान हाणामारी झाली. हिंसक जमावाने अनेक वाहने जाळली आणि परिसरातील घरे आणि क्लिनिकची तोडफोड केल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा ताफा गल्लीबोळात शिरताना काही रहिवासी आपापल्या गॅलरीत आले होते.
हंसापुरी येथील एका रहिवाशाने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, सोमवारी रात्री १०ः३० वाजताच्या सुमारास हिंसक जमाव त्यांच्या घरी आला. जमावाने त्यांच्या घराबाहेर पार्क केलेली त्यांची वाहने जाळली आणि त्यांनी वाहने आणि मालमत्ता जाळल्या. जमावातील काही जणांनी आपला चेहरा झाकून सीसीटीव्ही कॅमेरा फोडला तसेच घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरवासीयांना शहरात शांतता राखण्याचे आवाहगन केेले आहे. फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करून हे आवाहन केले आहे.
संबंधित बातम्या