मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या १७ दिवसापासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. तसेच उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. मात्र बीडमध्ये परवानगी नाकारल्यानंतरही रास्ता रोको केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाई करत जरांगे यांच्यासह ४२५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी २२ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. पोलिसांची परवानगी न घेता २२ ठिकाणी रस्ता अडवून सामान्यांना वेठीस धरण्यात आले होते. वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सामान्यांना त्रास झाला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा आंदोलकांविरोधात बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत २२ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ४२५ हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आज बीड जिल्ह्यात दुपारी १२ ते ५ इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अफवा पसरवल्या जाऊ नयेत म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. संभाजीनगर व जालन्याच्या सीमा सील करण्याबरोबरच दोन्ही जिल्ह्यांकडे जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.