महाराष्ट्र सेवा संघाच्या गिरिमित्र विभागाद्वारे आयोजित गिरिमित्र संमेलन यंदा १३ आणि १४ जुलै २०२४ रोजी मुलुंड येथे संपन्न होणार आहे. यंदा संमेलनाचे एकविसावे वर्ष असून पोलंडचे जगप्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलेकी (Krzysztof Wielicki) यंदा संमेलनाचे प्रमुख पाहुणे आहेत. ‘पीओलेट डी ऑर’ या जीवन गौरवाने सन्मानित वैलेकी हे अल्पाईन पद्धतीच्या आरोहाणातील अग्रणी आहेत. ऐकट्याने, नविन मार्गाने, प्रथम आरोहण, हिवाळी मोहिमा असे त्यांचे अष्टहजारी शिखर मोहीमांचे वैशिष्ट्य आहे. एव्हरेस्ट, कांचनजुंगा व ल्होत्से शिखरांवर त्यांनी प्रथम हिवाळी आरोहण करण्याचा मान मिळवला आहे. गिरिमित्र संमेलनात वैलेकीचे सादरीकरण आणि अनुभव कथन डोंगर भटक्यांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणार आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले यांची प्रकट मुलाखत या संमेलनात होणार आहे.
दरवर्षी जुलैमध्ये मुंबईत गिरिमित्र संमेलन आयोजित करण्यात येतं. यात महाराष्ट्रातील सुमारे ७०० हून अधिक डोंगरभटके उपस्थित असतात. माउंटेनिअर्स असोसिएशन ऑफ डोंबिवली या संस्थेने संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली असून सतीश गायकवाड हे यंदाच्या संमेलनाचे संमेलन प्रमुख आहेत.
यंदाचा गिरिमित्र ‘जीवनगौरव’ सन्मान ज्येष्ठ गिर्यारोहक प्रजापती बोधणे यांना जाहीर झाला आहे. तसेच, गिरिमित्र गिर्यारोहक सन्मान कैवल्य वर्मा व जितेंद्र गवारे यांना आणि गिर्यारोहक संथात्मक कार्य सन्मान सुनील गायकवाड (शिवदुर्गमित्र लोणावळा), सतीश गायकवाड (माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली) आणि श्रीकांत कासट (संगमनेर) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच गिरिमित्र गिरीभ्रमण संस्था सन्मान मैत्रेय प्रतिष्ठान कोल्हापूर आणि गिरीकुजन पुणे या दोन संस्थांना आणि गिरिमित्र शरद ओवळेकर विशेष सन्मान गडकरी परिवार रायगड यांना जाहीर करण्यात आला आहे. हे सन्मान मान्यवरांच्या हस्ते संमेलनात प्रदान करण्यात येतील. संमेलनात १३ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान गिरिमित्र संध्या कार्यक्रमात गिरिपटांच्या स्पर्धेतील निवडक फिल्म, अनुभव कथन, अभ्यासपूर्ण सादरीकरण आणि जगप्रसिद्ध गिर्यारोह वैलेकी यांची मुलाखत होणार आहे.
संमेलनाच्या मुख्य कार्यकमात १४ जुलै रोजी गिरिमित्र सन्मान प्रदान, मान्यवरांचे भाषण, क्रिस्तोफ वैलेकी यांचे सादरीकरण, प्रविण भोसले यांची मुलाखत, व्यासपीठावर बोल्डरिंग व डायनो स्पर्धा तसेच पारितोषक प्राप्त गिरिपटांचे सादरीकरण होईल. संमेलनानिमित्त छायाचित्रण, ब्लॉग, रिल, अनुभव कथन, रेखाचित्र आणि गिरिपटांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या