Pune RTO action : पुण्यात बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पीएमपी प्रशासन आणि पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने मोहीम उघडली असून पीएमपीचालकांना अडथळा ठरणाऱ्या व बसस्थानक, थांब्याच्या ठिकाणी येऊन बस प्रवासांची वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात १ हजार ६२० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सोबतच ओला, उबेर, आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३९ वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांचकडून ३ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बेशिस्त रिक्षा चालकांमुळे पुणेकर हैराण झाले आहे. पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीच्या बसस्थानकापासून असेच एसटी बस स्थानकापासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबण्यास मनाई आहे. असे असतांना मात्र, हा नियम पायदळी तुडवून पुण्यातील रिक्षाचालक बिनदिक्कतपणे बसस्थानक परिसरात वावरत प्रवाशांची ने आण करतात. रिक्षा चालक हे पीएमपीच्या स्थानकांच्या परिसरात येऊन रिक्षा उभी करत असतात. तर बसचालकांना अडथळा होईल, या प्रकारे रिक्षा चालवतात. त्यामुळे या रिक्षा चलकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संस्था, संघटनांनी पीएमपी प्रशासनाकडे आणि आरटीओकडे सातत्याने केली होती.
अखेर या मागणीची दखल घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून बेशीस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यास पीएमपी आणि आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या साठी वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. तर या पथकासोबत पीएमपीकडील चार सेवक आणि एक आरटीओ अधिकारी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी नेमण्यात आले आहेत.
या दोन्ही ठिकाणी दोन संयुक्त दक्षता पथके तैनात करण्यात आले होते. गेल्या ३ महिन्यात या पथकाने १६२० रिक्षाचालकांवर कारवाई करत ३ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. स्वारगेट पोलिसांनी देखील स्वारगेट बसस्थानक परिसरात वाहतुकीला अडथळा करणाऱ्या ओला, उबेर आणि रिक्षा चालक खासगी प्रवासी गाड्या आदींवर जानेवारी ते मार्च महिन्यांत ५३० वाहनांवर कारवाई करत दंड वसूल केला आहे.
जानेवारी महिन्यात ५५३, फेब्रुवारीत ६२२, मार्च महिन्यात ४४५ असे एकूण १,६२० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करून ३ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.