Pune Nilesh Rane R Deccan: करवसूलीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या घरासमोर बॅन्डवाजवून वसूली करणाऱ्या तसेच तो न भरल्यास जप्तीची कारवाई करणाऱ्या पुणे महागर पालिकेचा दुटप्पीपणा पुढे आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुण्यातील डेक्कन परिसरातील त्यांच्या व्यावसाईक मालमत्तेची ३ कोटी ७७ लाख रक्कम थकवली असतांना, त्यांच्याकडून केवळ २५ लाख रुपये घेऊन त्यांची थकबाकी शून्य केल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, ती रक्कम चुकून दाखवण्यात आल्याची सावरासावर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय दाबवातून नीलेश राणे यांना ही सूट दिल्याची चर्चा आहे.
पुणे महानगर पालिकेने शहरात थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक बड्या प्रॉपर्टी आणि जागांवर कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक मोठ्या व्यक्तिंचा देखील समावेश आहे. नीलेश राणे यांची पुण्यात डेक्कन येथे आर डेक्कन नावाची व्यावसायिक मालमत्ता आहे. या ठिकाणी फूड मॉल, चित्रपट गृह, तसेच अनेक व्यावसाईक गाळे आहेत. या मालमत्तेवरील ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांकहा कर थकवल्याने बुधवारी पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मालमत्ता सील केली होती. मात्र, पालिका उपायुक्त माधव जगताप यांनी मिळकतकर थकलेली रक्कम चुकून जास्त दाखवण्यात आल्याचे सांगितले. ३ कोटी ७७ लाखांचा मालमत्ताकरा ऐवजी राणेंच्या कंपनीकडून फक्त २५ लाखांचा चेक घेतल्यावर महापालिका प्रशासनाने राणेंवरील थकबाकी शून्य केली. एवढेच नाही तर सील केलेली मालमत्ता पुन्हा खुली करण्यात आली.
नीलेश राणे यांच्या कुटुंबीयांनी ही थकबाकीची रक्कम खोटी असल्याचे सांगत यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो ऐकत केवळ २५ लाख रुपये घेत सील काढले. यामुळे या प्रकारे आक्षेप घेणाऱ्यांची तब्बल ८५० कोटी रुपयांची रक्कम देखील माफ करणार का असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.
दरम्यान, राणे यांच्या मालमत्ते बद्दल देण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. या बाबतचे पत्र देखील पत्र महापालिकेने काढले आहे. या पत्रावर उपायुक्त माधव जगताप यांची सहीदेखील आहे.
संबंधित बातम्या