भूमिपजून आणि उद्घाटनांसाठी आज होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळं रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘पुणे मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आज सहाव्यांदाच या कामाचं उद्घाटन करायला येणार होते,’ याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली.
मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येणार होते, त्याचं उद्घाटन आतापर्यंत पाच वेळा झालं आहे. हा प्रकल्प एकच आहे. मात्र उद्घाटन पुन्हा-पुन्हा केलं जात आहे. पहिल्यांदा पंतप्रधान ग्राऊंड ब्रेकिंगसाठी आले होते. नंतर पहिल्या ट्रायलसाठी आले होते. ह्या सगळ्यांची यादी पुण्यातील पत्रकारांकडं आहे. आज मोदींचा दौरा रद्द झाला नसता तर आज सहाव्यांदा त्याच कामचां उद्घाटन झालं असतं, हे सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणलं. हे उद्घाटन ऑनलाइनही होऊ शकतं, असंही सुळे म्हणाल्या.
'पंतप्रधान हे खूप कामात असतात. त्यांच्या कार्यालयाच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल. मात्र महाराष्ट्र सरकार देशातील इतक्या महत्त्वाच्या माणसाचा वेळ एकाच कामासाठी का घेतंय? दिल्लीला मी नावं ठेवणार नाही, पण राज्य सरकारचं कौतुक वाटतं. ते एकाच कामासाठी सहाव्यांदा पंतप्रधानांना का बोलवतायत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला.
कालच्या पावसामुळं पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला योग्य नियोजन न करता होत असलेली विकासकामं जबाबदार असल्याचं सुळे म्हणाल्या. ही कामं करताना ड्रेनेजची पर्यायी व्यवस्था होताना दिसत नाही. त्यातून पाणी तुंबतं, असं त्या म्हणाल्या.
'कितीही पाऊस झाला तरी पंतप्रधानांचा कार्यक्रम होईल असं कालपर्यंत सत्ताधारी म्हणत होते. प्रशासनही तसं सांगत होतं. प्रशासन नेमका काय जादू करणार होतं माहीत नाही. त्यामुळं मीही पुण्याला निघाले होते. पण दुर्दैवानं कार्यक्रम रद्द झाला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळं पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचं ठिकाण असलेल्या एसपी कॉलेजच्या मैदानावर पाणी साचलं होतं. महाराष्ट्र मेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांनी सांगितलं की, आयएमडीनं गुरुवारी जारी केलेल्या ऑरेंज अलर्टमुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पाऊस पडल्यास कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळं लोकांच्या सुरक्षिततेसाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.'