१२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक व मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्याचबरोबर काळाराम मंदिरात महाआरती, गोदावरी जलपूजन व रोड शो केला होता. त्यानंतर मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकचे लोकार्पण केले. यानंतर सात दिवसांच्या अंतराने मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सोलापुरात देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर उद्घाटनाचे धार्मिक विधी सुरू झाल्यानंतर व राम लल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी म्हणजेच १९ जानेवारी रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. आपल्या दौऱ्यात मोदी रे नगर येथील ३० हजार पैकी १५ हजार तयार घरांचे वितरण करणार आहे. हा गृहप्रकल्प तब्बल ३५० एकर जमिनीवर साकारला आहे. म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
साडे तीनशे एकर जमिनीवर ८३४ इमारतींच्या या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना केवळ पाच लाखात आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना (शहरी)योजनेंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत. या गृहप्रकल्पात तब्बल ३० हजार सदनिका बांधल्या आहेत. त्यातील १५ हजार सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. मोदींच्या हस्ते या योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे वाटप केले जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते ९ जानेवारी २०१९ रोजी केले होते. पाच वर्षात यातील १५ हजार घरकुले बांधून तयार झाली आहेत.
झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःच हक्काच घर असावं. याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला आहे. असंगठित कामगारांना निवाऱ्या बरोबरच मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.