मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM modi Mumbai Visit : तिसऱ्यांदा पंतपधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर, शनिवारी ‘या’ कामांचे भूमिपूजन

PM modi Mumbai Visit : तिसऱ्यांदा पंतपधान बनल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर, शनिवारी ‘या’ कामांचे भूमिपूजन

Jul 11, 2024 07:11 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन शनिवारी करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा बोगदा जाणार आहे.

मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर
मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (१३ जुलै) रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मोदींचा पहिलाचा मुंबई दौरा आहे. त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन शनिवारी करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा बोगदा जाणार आहे. 

गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा तिसरा टप्पा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. याच्या जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन मोदी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे, केंद्रीय सहकार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

वाहतूक कोंडींची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. त्याचबरोबर नव्याने बांधल्या जाणाऱ्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार आहे. मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. मात्र याचे आयुर्मान संपत येत असल्याने ते नव्याने बांधले जाणार आहे. 

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे फायदे

• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता. 
•  हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास  पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होणार. यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार. 
• या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.   
• गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल.

 

WhatsApp channel
विभाग