विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका-pm narendra modi to mark one year of vishwakarma programme in wardha today ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका

विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका

Sep 20, 2024 11:08 AM IST

Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून वर्धा इथं त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान विश्वकर्मा कार्यक्रमाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका
विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका (PTI)

Narendra Modi in Wardha : केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेला १८ सप्टेंबर रोजी वर्ष पूर्ण झालं. या निमित्त होणाऱ्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा इथं येणार आहेत. या कार्यक्रमांबरोबरच अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन व उद्घाटना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली होती. तळागाळातील गरीब कारागिरांना आर्थिक मदत देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून १८ प्रकारच्या व्यवसायातील कारागिरांना मदत देण्यात येते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज १८ कारागिरांना कर्ज वाटप केलं जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देखील देतील.

या योजनेच्या यशस्वी वर्षपूर्तीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्मृती तिकिटाचं प्रकाशन करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालायानं दिली आहे.

पीएम मित्र पार्कची पायाभरणी

पंतप्रधान अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल रीजन अँड अ‍ॅपेरल (PM Mitra) पार्कची पायाभरणी करतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंमलबजावणी एजन्सी म्हणून एक हजार एकर जागेत हे उद्यान विकसित करणार आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं ७ अतिरिक्त पीएम मित्र उद्यानांना मंजुरी दिली आहे.

पीएम मित्र पार्कमुळे थेट परकीय गुंतवणुकीसह (एफडीआय) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि या क्षेत्रात नावीन्य पूर्ण आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.

स्टार्टअपचा शुभारंभ

याशिवाय नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र सरकारची 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप या योजनांचा देखील शुभारंभ करतील.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजनेमुळं महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यात मदत मिळेल आणि २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. यात मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी २५ टक्के विशेष तरतूद करण्यात आली आहे.

Whats_app_banner