पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धमकीचा कॉल आला. धमकीच्या कॉलमुळे मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेण्यात आला. प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे.
बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून शस्त्राची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या फोन कॉलची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचे समोर आले. या प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फोन करणारी महिला मानसिक आजारी असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेच वय अंदाजे ३४ वर्ष असल्याच समजतंय. महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली. या महिलेच्या चौकशीदरम्य़ान पोलिसांना कोणतीही संशयित माहिती मिळाली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील एका व्यक्तीने केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हातात तलवार घेऊन तरुणाने हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केला होता.