PM Modi Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जंगी स्वागत केले. दोघामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली असून यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. बांग्लादेश, रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध, एफ ३५ लढाऊ विमान आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्यात मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. तहव्वुर राणाचे भारताला प्रत्यार्पण करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूरी दिली. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही घोषणा केली. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेला आणि जगातील सर्वात वाईट गुन्हेगारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला माझ्या सरकारने मान्यता दिली आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे, जेणेकरून त्याला भारतात न्याय मिळू शकेल, असे ट्रम्प म्हणाले. आता तो भारतात परतणार आहे, जिथे त्याला न्यायाला सामोरे जावे लागणार आहे.
राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने गेल्या काही दिवसांपासून केली होती. राणा सध्या लॉस एंजेलिसच्या तुरुंगात आहे. तो कॅनडाचा नागरिक असून तो मूळचा पाकिस्तानी आहे. २६/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीयाच्याशी त्याचा संबंध आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात हेडली आणि इतर दहशतवाद्यांना पाकिस्तानातील इतर दहशतवाद्यांना राणाने मदत केल्याचा आरोप आहे.
अमेरिका भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने विकण्यावर देखील यावेळी चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, या वर्षापासून आम्ही भारताला अब्जावधी डॉलर्सची लष्करी विक्री वाढवणार आहोत. भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील हा संरक्षण करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
ट्रम्प आणि मोदी यांच्यात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवरही चर्चा करण्यात आली. अमेरिकेत भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्याबाबत यावेळी मोठी घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “लवकरच बोस्टन आणि लॉस एंजेलिसमध्ये दोन दूतावास सुरू होणार आहेत. या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील.” अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत यावरही पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.
संबंधित बातम्या