PM Modi Mumbai tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. आज संध्याकाळी ५ वाजता मोदी मुंबईत येणार आहेत. मोदी यांच्या हस्ते मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजनही देखील मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
मुंबईत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्यासाठी आणि वेगवान वाहतुकीसाठी मुंबई पालिकेतर्फे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम नियोजित वेळेत करणयाचे पालिकेचे उद्दिष्ट आहे, या कामाचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने बांधण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या बोगद्यांमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या महत्त्वाकांक्षी जीएमएलआर प्रकल्पामुळे पश्चिम भागातील गोरेगाव ते शहराच्या ईशान्येकडील मुलुंड दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्याच्या ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल, असे पालिकेने म्हटले आहे.
हे दोन बोगदे प्रत्येकी ४.७० किमी लांबीचे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हे बोगदे दर ३०० मीटरअंतरावर एकमेकांना जोडले जातील आणि टनेल बोरिंग मशिनचा वापर करून खोदकाम केले जाईल. दुहेरी बोगदा प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६३०१.०८ कोटी रुपये आहे. ऑक्टोबर २०२८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
नवी मुंबईतील तुर्भे येथे कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गति शक्ती मल्टी मोडल कार्गो टर्मिनलचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. कल्याण यार्डमुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे विलगीकरण होण्यास मदत होणार आहे. रिमॉडेलिंगमुळे यार्डची अधिक गाड्या हाताळण्याची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल आणि रेल्वे ऑपरेशनची कार्यक्षमता सुधारेल. नवी मुंबईतील गति शक्ती मल्टी मोडल कार्गो टर्मिनल ३२ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळात उभारण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ चे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसयेथील नव्या लांब प्लॅटफॉर्ममुळे लांब गाड्यांना सामावून घेता येईल, प्रत्येक गाडीला जास्त प्रवासी मिळू शकतील आणि वाढलेली रहदारी हाताळण्याची स्थानकाची क्षमता वाढेल.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे ५,६०० कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करणार असून या साठी ते मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) सचिवालयाला भेट देणार आहेत.
संबंधित बातम्या