पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे आयोजित जाहीर सभेत गणपतीच्या आरतीच्या मुद्दावरून कॉंग्रेस पक्षावर जोरदार प्रहार केला. नुकत्यात पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या दरम्यान मोदी यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली होती. यावर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत टीका केली होती. या टीकेवर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच उत्तर दिलं आहे.
मोदी म्हणाले, ‘मी गणपतीच्या दर्शनासाठी (सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांच्या घरी) गेलो असता काँग्रेसमधलं तुष्टीकरणाचं भूत जागं झालं. तुष्टीकरणासाठी काँग्रेस पक्ष काहीही करू शकतो. आता काँग्रेस पक्ष गणपतीच्या आरतीचाही द्वेष करू लागला आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा गणपती उत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव बनला होता, या घटनेची ही महाराष्ट्राची भूमी साक्षिदार आहे. गणेशोत्सवात प्रत्येक धर्म आणि समाजाचे लोक एकत्र आले होते. त्यामुळेच काँग्रेसला गणपतीच्या आरतीची चीड येते’ असं मोदी म्हणाले. कॉंग्रेस पक्षात आमची आस्था आणि संस्कृतीबाबत थोडा जरी सन्मान असता तरी त्यांनी गणपती आरतीचा विरोध केला नसता, असं मोदी म्हणाले.
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने गणपती बाप्पालाच कोठडीच डांबले होते, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. मोदी म्हणाले, 'कर्नाटकात गणपतीच्या ज्या मूर्तीची लोक पूजा करत होते, त्या मूर्तीला पोलीस व्हॅनमध्ये कैद करण्यात आले होते. इकडे महाराष्ट्रात गणपतीची आराधना सुरू असताना तिकडे कर्नाटकात मात्र गणेश मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये होती. गणपतीच्या या अपमानामुळे देशभरात संताप आहे. याविषयाबाबत बोलण्यास कॉंग्रेसच्या मित्र पक्षांच्या तोंडावर जणू कुलुप लागलेले दिसते. त्यांच्यावर कॉंग्रेसच्या संगतीचा असा काही रंग चढलाय की गणपतीच्या अपमानाविरुद्ध बोलण्याची त्यांची हिंमत होत नाहीए. कॉंग्रेसच्या या पापांचे आम्हाला एकजुटीने उत्तर द्यावे लागणार आहे. परंपरा, प्रगती, सन्मान आणि विकासच्या अजेंड्यासोबत आम्हाला उभं रहावं लागेल. आम्ही एकत्रित येऊनच महाराष्ट्राची अस्मिता वाचवून गौरव आणखी वाढवू आणि महाराष्ट्राच्या स्वप्न पूर्ण करू, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.
कॉंग्रेस पक्ष हा देशातला सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप मोदी यांनी सभेत केला. देशातला सर्वाधिक भ्रष्ट परिवार हा शाही परिवार असल्याचं मोदी म्हणाले.