पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)अर्थातच अटल सेतू मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. देशातील सर्वात लांब पूल तसेच सागरी सेतू अशी या पुलाची ओळख होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदि उपस्थित होते.
अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता २ तासांवरून केवळ २० मिनिटांवर आले आहे. या मार्गावरून मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे.
सहा पदरी पूल एकूण २२ किमी लांब असून त्यापैकी १६.५ किमी अंतर समुद्रातून कापणार आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा सेतू क्रांतिकारी ठरणार आहे. एमटीएचएलमुळे रिअल इस्टेट हब म्हणून मुंबईचा महत्त्व आणखी वाढणार आहे. या सेतूमुळं मुंबईतील मालमत्तांच्या किंमती वाढतील आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावानं ओळखला जाणारा एमटीएचएल मुंबईतील शिवडी इथून सुरू होतो आणि रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवा इथं संपतो. या पुलासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलामुळं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
संबंधित बातम्या