Devendra Fadnavis BJP National President news : राज्यातील भाजपचे प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मोठी अपडेट पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्यानंतर आता त्यांना राज्यातून केंद्रीय पातळीवर नेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. भाजप त्यांना कायमस्वरूपी दिल्लीत बोलवणार असून त्यांच्यावर भाजपची राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. या बाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांना आधी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष पद किंवा या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ठेऊन नंतर दिल्लीत बोलवले जाईल ही देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात दारुण पराभव झाला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या पराभवाची जबाबदारी घेत त्यांच्यावरील सर्व जबाबदाऱ्यातून त्यांना मुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांना आता कार्य करायचे आहे असे देखील पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांनी सांगितलं होतं. यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना आता थेट दिल्लीत बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील उत्कृष्ठ राजकारणी म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी पक्षाला सत्तेत आणून तसेच अडचणीच्या काळात देखील बाहेर काढले आहेत. निवडणुकीतील त्यांची रणनीती व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कौशल्य पाहून पक्षश्रेष्ठी आता त्यांच्या अनुभवाचा केंद्रासाठी फायदा करून घेण्याच्या मानसिकतते आहेत. यामुळे त्यांना दिल्लीत बोलावून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या आधी या पदासाठी विनोद तावडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता असल्याने आता त्यांना कधी बोलावणे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.