Maharashtra Assembly Elections : 'अनेक अवयव निकामी झाल्याचे सांगून वैद्यकीय जामीन मिळवलेले नवाब मलिक हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे जामिनाच्या नियमांचं उल्लंघन असून त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर मलिक यांना झटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबईतील एक नागरिक सॅमसन पाथरे यांनी ही याचिका केली आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध व मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर आजारपणाचं कारण देत त्यांनी जामिनाची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालायनं जुलै महिन्यात त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. नियमित जामिनावर सुनावणी होईपर्यंत हा जामीन कायम राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.
सध्या मलिक हे मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. हिरीरीनं प्रचार करत आहेत. नवाब मलिक यांना तिकीट देण्यास भाजपचा विरोध होता. मात्र, निवडणूक लढण्यावर ठाम राहून मलिक यांनी अजित पवार यांच्याकडून तिकीटही मिळवलं व आता ते हिरीरीनं प्रचारात उतरले आहेत.
'नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारण देऊन जामीन मिळवला होता. मला किडनीचा विकार झाला असून मला सतत उपचारांची गरज आहे असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया सोडाच, ते कधी रुग्णालयातही दाखल झाले नाहीत. ते निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत. हा वैद्यकीय जामिनाचा सरळसरळ गैरवापर आहे, याकडं पाथरे यांनी याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधलं आहे.
नवाब मलिक हे सध्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार अबू आझमी यांचं आव्हान आहे. मानखुर्द शिवाजीनगर ड्रग्जमुक्त करण्याचं आश्वासन ते मतदारांना देत आहेत. भारतीय जनता पक्षानं मात्र त्यांच्या प्रचाराकडं पाठ फिरवली आहे. प्रचारात पंतप्रधान मोदींचा फोटो वापरणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. आता त्यांच्या जामिनाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं मलिक यांना निवडणुकीआधीच तुरुंगात जावं लागणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठई येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.