मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Suhasini Nandgaonkar: प्रसिद्ध गायिका सुहासिनी नांदगावकर काँग्रेसमध्ये; प्रवेशाचं कारणही सांगितलं!

Suhasini Nandgaonkar: प्रसिद्ध गायिका सुहासिनी नांदगावकर काँग्रेसमध्ये; प्रवेशाचं कारणही सांगितलं!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 06, 2022 07:03 PM IST

Suhasini Nandgaonkar Joins Congress: प्रसिद्ध पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Suhasini Nandgaonkar
Suhasini Nandgaonkar

Suhasini Nandgaonkar Joins Congress: प्रसिद्ध कवी व माजी आमदार शांताराम नांदगावकर यांच्या स्नुषा पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर यांनी आज आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सुहासिनी नांदगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी, तू सुखकर्ता, गोडी गुलाबी अशा मराठी चित्रपटांबरोबरच सैनिक, स्टंटमन, छोटा सा घर अशा अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. ३० वर्षांपासून त्या पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत असून देश विदेशातही त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संगीत शिक्षिका म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘काँग्रेस हाच सर्व जाती-धर्मांना सामावून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणारा पक्ष आहे. मागास, वंचित, दलित समाजाच्या विकासाचं काम काँग्रेस सरकारनंच केलं, परंतु सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दलित, मागास, पीडित समाजाचा विकास काँग्रेस पक्षच करू शकतो याचा विश्वास असल्यानंच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एक कलाकार म्हणून कलाकारांचे प्रश्न व समस्या सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करेन,’ असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या विचारानं प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय!

'काँग्रेसच्या विचाराला माननारे लोक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळं लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. देश तोडण्याचं काम काही पक्ष व संघटना करत असताना देश जोडण्याची भूमिका घेऊन राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ऐतिहासिक पदयात्रा सुरू केली आहे. तोडणाऱ्यांपेक्षा जोडणारे महत्वाचे असतात ही लोकांची भावना आहे. काँग्रेस विचारानं प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

WhatsApp channel