मोबाईलचे व्यसन तरुण पिढीसोबत लहान मुलांमध्येही वाढताना दिसत आहे. मोबाईल घेऊ न दिल्यानं शाळकरी मुलांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता महिलांनाही मोबाईलचा हट्ट जीवावर बेतू लागला आहे. पतीने नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने रुसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडीतील पवनानगर येथे ही घटना घडली.
शिवानी गोपाल शर्मा (वय २०, रा. पवनानगर, काळेवाडी, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट न पुरवल्यामुळे शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती पतीकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट करत होती. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे पती हतबल होता व पत्नीला नवीन मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हता. पती आपली इच्छा पूर्ण करत नसल्याचे पाहून पत्नीने घरात कोणी नसताना गळफास घेत आपले जीवन संपवले.
महिलेचा पती गोपाल शर्मा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. घरी एकटीच असल्याने मोबाईल घेऊन देण्याची मागणी शिवानीने केली होती. मात्र पैशांच्या अडचणीमुळे तो मोबाईल खरेदी करु शकत नव्हता. ‘तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल’, असे तिचे म्हणणे होते. मात्र, पैशांच्या कमतरतेमुळे पगार झाल्यावर नवीन मोबाइल घेऊ, असे गोपाल यांनी सांगितले.
त्यावरून शिवानी रुसली होती. बुधवारी शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती नोकरीवरुन आल्यावर दरवाजा उघडताच त्याला धक्का बसला. पत्नी दोरीला लटकल्याचे दिसले. त्याने तत्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचा जबाब नोंदविला आहे. नवीन मोबाइल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक कारण समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.