Pune crime news : पुण्यात हिंजेवाडी येथे बनावट नोटा तयार करणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. चीन मधून ऑनलाइन कागद मागवून तर पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून ऑफसेट मशीन खरेदी करत दिघीत बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिघीतिल मॅगझिन चौकात सुरू असलेला या उद्योगाचा पर्दाफाश देहूरोड पोलिसांनी केला. या प्रकरणी म्होरक्यासह सहा जणांना बेड्या थोकण्यात आल्या असून ७० हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई किवळे येथील मुकाई चौकात रविवारी करण्यात आली.
ऋतिक चंद्रमणी खडसे (वय २२, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव, मूळ रा. मंगरुळपीर, जि. वाशिम), सुरज श्रीराम यादव (वय ४१, रा. चहोली), आकाश विराज धंगेकर (वय २२, रा. आकुर्डी, मूळ रा. अंबेजोगाइ, ता. जि. धाराशिव), सुयोग दिनकर साळुंखे (वय ३३, रा. आकुर्डी, मूळ रा. दुधवंडी, ता. पलूस, जि. सांगली), तेजस सुकदेव बल्लाळ (वय १९, रा. अरणगाव, ता. भूम, जि. धाराशिव), प्रणव सुनील गव्हाणे (वय ३०, रा. आळंदी रस्ता, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांना कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋतिक खडसे हा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील पदविका धारक आहे. तर सुरज यादव हा वाहन चालक आहे. त्यांना छपाइचा व्यवसाय सुरू करायचा होता. या साठी दोघे आणि त्यांचे काही साथीदार एकत्र येत त्यांनी दिघीत मॅगझीन चौकात एक गाळा भाड्याने घेत पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे एक जुने ऑफसेट मशिन खरेदी केले. त्यांनी पत्रके तसेच इतर छपाईची कामे सुरू केली. मात्र, त्यांना हवे तसे काम मिळाले नाही. यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढला. यामुळे ही कर्ज कमी करण्यासाठी त्यांनी बनावट नोटा छापण्याचे ठरवले. सुरज याने नोटांचे डिजाइन तयार केले. छपाईसाठी लागणारा कागद त्यांनी चीन माडून ऑनलाइन मागवला. हा कागद तेजस बल्लाळच्या पत्त्यावर मागवण्यात आला. दरम्यान, त्यांनी सुरुवातीला ७० हजार रुपये किमतीच्या ५०० च्या नोटांची छपाई केली. या नोटा बाजारात खपवण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीशी संपर्क साधत त्यांना १ लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार या नोटा ऋतिक किवळे येथे मुकाई चौकात जात होता. या व्यवहाराची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या पथकाने ऋतिक याला अटक करत बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली.
पहिल्या टप्यात दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा छापता येतील इतका कागद चीन येथून मागवण्यात आला. होता. आरोपींनि ७० हजार रुपये किमतीच्या नोटा छापल्या. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून बनावट नोटा छापण्यासाठी शाई कोठून आणली, याचाही तपास केला जात आहे.