Pimpri Chinchwad girl rape crime : पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील क्रिएटिव्ह अॅकॅडमी या निवासी शाळेच्या संचालकाने अॅकॅडमीतील १० वीत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल दोन वर्ष आरोपीने मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी संचालकाला अटक करण्यात आली आहे.
नौशाद अहमद शेख असे नराधम आरोपीचे नाव आहे. तो क्रिएटिव्ह अॅकॅडमी या निवासी शाळेचा संचालक आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख हा क्रिएटिव्ह अॅकेडमी नामक निवासी शाळा चालवतो. त्याच्या या निवासी शाळेत २०२१ मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववीमध्ये अॅडमिशन घेऊन दिली होती. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी २ लाख २६ हजार रुपये देखील दिले होते. पीडित मुलगी ही अॅकेडमीच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. तर याच हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर आरोपी नौशाद शेख देखील राहत होता. दरम्यान, पीडित मुलगी १४ वर्षांची असताना शेख याने मुलीला तुझे इतर मुलांशी अनैतिक संबंध असल्याचे संगत तसेच तिला तिचे अश्लील फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केले. २०२२ मध्ये देखील मुलीला धमकावून तिला फ्लॅटवर बोलवून त्याने अत्याचार केले. मात्र, हा प्रकार सहन न झाल्याने मुलीने प्रतिकार केला. मात्र, आरोपीने तिला धमकी देत अत्याचार सुरूच ठेवले.
दरम्यान, पीडित मुलगी ही दिवाळीच्या सुट्टीत घरी जात असतांना त्याने तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या अवस्थेत असलेली पीडित मुलगी ही शाळेत राहण्यास तयार नव्हती.यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला पुन्हा गावी नेले. मात्र, ११ जानेवारीला पीडित मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग घरच्यांना सांगितला. या घटनेमुळे घरचे देखील हादरले.
त्यांनी या प्रकरणी पोलिसांत जात आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खबळल उडाली आहे. आरोपी शेख याला या पूर्वीही अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. अॅकॅडमीतील एका विद्यार्थीनीने २०१४ मध्ये शेख विरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी शेख हा फरार झाला होता.