Pimpri Chinchwad news : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार आहेत. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत शनिवारी भेट घेतली. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांची भेट घेणार आहे. हे सर्व जण शरद पवार यांच्या पक्षात लवकरच प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा दणदणीत पराभव केला. महायुटीतील अजित पवार यांच्या गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने ९ जागांवर विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकी प्रमाणेच महायुतीचा परभव होईल या भीतीने अनेक आजी माजी आमदार आणि कार्यकर्ते हे पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा गढ मानला जातो. येथील महानगर पालिकेवर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. मात्र, याच गडाला आता शरद पवार हे सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.
पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. तर आज माजी आमदार विलास लांडेंच्या उपस्थितीत हे सर्व सण पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार आहे. हे सर्व जण ५ जुलै नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे.
या माजी नगरसेवकांच्या भेटीवर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मला रोज दोन तीन तास भेटीसाठी काढावे लागतात. रोज नवे नवे लोक पक्षात येण्यार आहेत. नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. जे आमच्या पक्षात येतील आम्ही त्यांचे स्वागत करणार असून नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे देखील पवार म्हणाले.