Pimpri Chinchwad Girlfriend kills Boyfriend: पुण्यातील पिंपरी- चिंडवड परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली. अपघाताचा बनाव करत प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीसह तिच्या चार मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरात घडली.
बालाजी उर्फ बाळू मंचक पांडे (वय, २८), असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत बालाजीच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून आरोपी प्रेयसीने काही मित्रांच्या मदतीने त्याच्या डोक्यात आणि पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत बालाजी गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी बालाजीला पिंपरी चिंचवड शहरातील वाय सी एम रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बालाजीचा अपघात झाला आहे, असा खोटा बनाव रचला. त्यावेळी आरोपींनी आपली खोटी नावे सांगितली.
दरम्यान, पोलिसांना आरोपींच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यानंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनीच बालाजीची हत्या केल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिनेश सूर्यकांत उपादे ,आदित्य शरद शिंदे यांच्यासह प्रेयसी आणि एका अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांनी सांगितलेल्या माहितीवरून अन्य आरोपींच्या शोधात बीड जिल्ह्यात एक पथक देखील रवाना करण्यात आले.
संबंधित बातम्या