पिंपरीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळताना सोसायटीचा गेट अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलगी हातात बाहुली घेऊन गेटजवळ खेळत होती, अचानक लोखंडी गेट अंगावर पडल्याने चिमुरडी जागेवरच संपली. ही घटना सोसायटीत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिंपरी- चिंचवडच्या बोपखेल परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
गिरीजा शिंदे (वय ३ वर्षे) असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन वर्षीय गिरीजा मित्रांसोबत सोसायटीच्या मोकळ्या भागात खेळत होती. हातात बाहुली घेऊन ती पळत होती, तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने सोसायटीचे स्लाइड होणारं गेट ओढलं. मात्र या गेट नादुरुस्त असल्याने ते थेट गिरिजाच्या अंगावर पडलं. गेट खाली दबून गिरिजाचा जागीच मृत्यू झाला.
चिमुकलीच्या अंगावर गेट पडल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पळत आले आणि तिला उचलून दवाखान्यात नेले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच गिरिजाचा मृत्यू झाला होता. तीन वर्षाचं बाळ गेल्याने शिंदे कुटूंबावर शोककळा पसरली आहे.
एक तरुण एका मुलीला एकतर्फी प्रेमातून त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचलत हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
गायत्री दाभाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तर दत्तू गायके असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मुलीला आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री दाभाडे ही शहरातील एका विद्यालयात दुसऱ्या वर्षात बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. ती हॉस्टेलला राहत होती. गायत्रीवर दत्तू गायके याचे एकतर्फी प्रेम होते. तो तिचा पाठलाग करत होता. तसेच तिला फोन करून रस्त्यात अडवून त्रास देत होता. ऐवढेच नाही तर माझ्यासोबत मैत्री कर, मला भेटायला ये अशी जबरदस्ती दत्तू गायत्रीला करत होता.
या घटनेची माहिती हॉस्टेलमधील मुलींनी सिडको पोलीस ठाण्यात दिली. आरोपी दत्तू गायके याला पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित बातम्या