Plane Crashes on Highway in Netherlands: रस्त्यावर गाड्या धावत असताना अचानक विमान कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हिडिओत दुर्घटनाग्रस्त विमान रस्त्यावरच जळत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे चालक घाबरले. एका कारचालकाने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही घटना नेदरलँडच्या रॉटरडॅमपासून ३७ मैल दूर असलेल्या ब्रेडामध्ये ३० जुलै २०२४ रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या विमान अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, विमानाने अचानक वळण घेतले आणि नंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर काही क्षणाच विमानाने पेट घेतला. व्हिडिओत रस्त्यावर कोसळलेल्या विमानातून धूर निघताना दिसत आहे. एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून दुसऱ्या बाजूने वाहने सावकाश धावताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान छोटे होते, ज्यामध्ये एक व्यक्ती प्रशिक्षण घेत होती. ब्रेडा एव्हिएशन फ्लाइट स्कूलने माहिती दिली की, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो त्यावेळी प्रशिक्षण घेत होता. आम्ही या घटनेची कारणे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा फ्लाइंग स्कूलकडून करण्यात आला आहे. मात्र, अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन मदत पोहोचावी म्हणून महामार्ग अनेक तास बंद ठेवण्यात आला होता.
नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या आठड्यात बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. सौरी एअरलाइन्सचे विमान टेकऑफनंतर अचानक कोसळले, त्यानंतर त्याला आग लागली. या अपघातात १८ जणांना जीव गमवावा लागला. अपघाताच्या वेळी विमानात कर्मचाऱ्यांसह १९ जण होते. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, एकमेव बचावलेला पायलट होता, त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.विमानात कंपनीचे फक्त कर्मचारी होते.'काठमांडू पोस्ट' या वृत्तपत्राने अपघातस्थळावरून १८ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा यांनी सांगितले की, 'पोखराला जाणाऱ्या विमानाच्या टेकऑफच्या वेळी धावपट्टीतील त्रुटीमुळे हा अपघात झाला.'