criminal nilesh ghaiwal met CM Eknath shinde : पार्थ पवार, श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अट्टल गुन्हेगारांसोबत फोटो पुढे आल्यावर आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील अट्टल गुन्हेगार नीलेश घायवळ सोबतचा फोटो आता पुढे आला आहे. खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात गुंडाराज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याचे म्हणत हे गुंड लोकशाहीचा आणि विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी पाळले आहे का असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
राज्यातील प्रमुख नेत्यांचे गुन्हेगारांसोबतचे फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. आधी पार्थ पवार यांनी गुंड गजानन मारणे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवासाच्या दिवशी पुण्यातील अट्टल गुंड हेमंत दाभेकर याने भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या. हा फोटो देखील काल खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड येथील गुंड आसिफ शेख उर्फ दाढी याला भेट देत असल्याचा फोटो पुढे आला हतो. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा फोटो पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करत महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात गुंडा राज असे ट्विट त्यांनी राऊत यांनी केले आहे. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य असे पोस्ट करत फोटोमधील हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, राज्यात गुंडाराज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री यांनी गुंडांना अभय दिले आहे. या लोकांना त्यांनी का अभय दिले आहे ? या लोकांचे कर्तुत्व काय आहे. लोकशाहीचा आणि विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी याना पाळले आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
नीलेश घायवळ हा पुण्यातील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुण्यातील विविधी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. खून, मारमारी, टोळी युद्ध, दरोडे, अपहरण या सारखे अनेक गुन्हे नीलेश घायवळ याच्यावर आहे. पुणे पोलिसांनी त्याला अटक देखील केली असून मोका अंतर्गत कारवाई देखील केली आहे.
निलेश घायवळ याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत असून त्याच्यावर पोलीस रेकॉर्डवर २३ ते २४ गुन्हे दाखल आहे. गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात ८ जून २०१० रोजी निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खुन केला होता. या खटल्यात फेब्रुवारी २०१९ मध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती.
संबंधित बातम्या