Pune Porsched Car Accident Update : पुण्यात कल्याणी नगर येथे बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्यावर मुलाला वाचवण्यासाठी विशाल अगरवाल याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना रात्री २.३० च्या सुमारास तब्बल ४५ वेळा कॉल केले. मात्र सुनील टिंगरे हे झोपले असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. अखेर जाग आल्याने विशाल अगरवालयाचा ४६ वा फोन टिंगरे यांनी उचलला. यानंतर पहाटे ४ च्या सुमारास टिंगरे हे पोलिस ठाण्यात पोहोचले. टिंगरे हे येरवडा पोलिस ठाण्याच्या सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान, या वरून आमदार सुनील टिंगरे हे अडचणीत आले होते. त्यांनी या बाबत नंतर खुलासा देखील केला होता.
कल्याणीनगर परिसरात विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शकार बेदरकारपणे चालवत दोघांना चिरडले होते. यात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. स्थानिक नागरिकांनी आरोपीला पडकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यावेळी आरोपी मुलाने नागरिकांना देखील पैसे देणीयचे आमिष दिले होते. दरम्यान, मुलाने दोघांना उडवले असून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कळल्यावर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालने १९ मे रोजी रात्री २.३० नंतर वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला. मात्र, आमदार टिंगरे हे झोपले असल्याने टिंगरे यांनी फोन उचलला नाही. दरम्यान, टिंगरे यांना जाग आल्यावर त्यांनी ४६ फोन उचलला.
या बाबतचे वृत्त देतांना एका वर्तमान पत्राने म्हटले आहे की, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना तब्बल ४५ वेळा फोन केला. यानंतर विशाल अगरवाल यांनी पुन्हा ४६ वा कॉल केला. यावेळी टिंगरे हे झोपेतून उठले आणि त्यांनी त्यांचा फोन उचलला. या नंतर ते सकाळी ६ वाजता येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही आमदार टिंगरे दिसत आहेत.
विशाल अगरवाल आणि टिंगरे यांचे संभाषण झाल्याची नोंद देखील पोलिसांकडे आहे. या बाबतची माहिती एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने या वृत्त पत्राला माहिती दिली आहे. नेमका काय संवाद झाला हे सांगण्यास संबंधित अधिकाऱ्याने नकार दिला. विशाल अगरवाल व आमदार टिंगरे हे व्यावसायिक भागीदार असून ही घटना त्यांच्या मतदार संघात घडली असल्याने ते पोलिस ठाण्यात गेले होते.
दरम्यान, ससुनचे डॉक्टर अजय तावरे यांची शिफारस देखील टिंगरे यांनी केल्याचे पुढे आल्यावर टिंगरे हे पुन्हा अडचणीत आले आहे.