samruddhi mahamarg accident news : गेल्या काही दिवसांपासून नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर सातत्याने भीषण अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळं वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या निर्माणात अनेक त्रुटी राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळं आता वाढत्या अपघातांमुळं नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्तास थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत नोटीस जारी करत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वीच एका खासगी बसला भीषण अपघात झाला होता. त्यात तब्बल २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर समृद्धी महामार्गावर सतत होत असलेल्या अपघाताच्या घटनांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोर्टाने राज्य सरकारच्या एमएसआरडी विभागाला नोटीस जारी करत महिन्याभरात उत्तर मागितलं आहे. याशिवाय समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहे?, याबाबतची कोर्टाकडून विचारणा करण्यात आली आहे. याचिकेत समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तज्ञांचे पॅनल करणे, चिन्हं लावणे तसेच प्राथमिक उपचार केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यानंतर या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन करण्यात आलं आहे. परंतु महामार्ग सुरू झाल्यापासून सतत अपघात होत असल्यामुळं सरकारच्या चिंता वाढलेल्या आहे. त्यातच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महामार्ग बंद करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोर्टाने राज्य सरकारला नोटीस जारी करत उत्तर मागितलं आहे.