मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ब्राह्मणांचा द्वेष करणारे लोक आंबेडकरवादी असूच शकत नाहीत - श्यामदादा गायकवाड

ब्राह्मणांचा द्वेष करणारे लोक आंबेडकरवादी असूच शकत नाहीत - श्यामदादा गायकवाड

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 29, 2024 06:10 PM IST

shyam gaikwad on Ambedkarite : ब्राह्मणांचा द्वेष करणारे लोक आंबेडकरवादी असूच शकत नाहीत, असं श्याम गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Shyam Gaikwad
Shyam Gaikwad

Shyamdada Gaikwad on Ambedkarite : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी सुरुवातीपासून ब्राह्मण्यग्रस्तांना विरोध केला, ब्राह्मणांना नव्हे असं ठणकावून सांगतानाच, ब्राम्हण द्वेषाची चळवळ चालवणारे लोक हे सच्चे ’आंबेडकरवादी' असूच शकत नाहीत, असं ठाम प्रतिपादन ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी शनिवारी केलं.

ते कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी झालेल्या डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या ११२ व्या जयंतीनिम्मित एका परिसंवादात बोलत होते. संविधान समर्थक दलाने 'सूर्यप्रभा माई ' या विषयावर हा परिसंवाद आयोजित केला होता. त्यात प्रख्यात कवी अरुण म्हात्रे, कादंबरीकार प्रा. अविनाश कोल्हे, प्रा.डॉ. विठ्ठल शिंदे, प्राचार्य डॉ. मिलिंद तायडे, प्रभाकर ओव्हाळ हे विचारवंत वक्ते होते.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ' बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ या ग्रंथाचा आधार असलेले ’बुद्ध चरित' लिहिणारा अश्वघोष कोण होता? राहुल सांकृत्यायन कोण होते? भदंत आनंद कौसल्यायन हे कोण होते? ते सारे ब्राहणच होते, याची आठवण गायकवाड यांनी यावेळी करून दिली.

Uddhav Thackeray : पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर, उद्धव ठाकरे भडकले!

'आपला देश भविष्यात एकाधिकारशाहीकडे वाटचाल करेल, असा इशारा माईंनी १९८० साली दिला होता. हे द्रष्टेपण आणि नेतृत्वाची पूर्ण क्षमता त्यांच्यात होती. मात्र, त्यांना बौद्ध समाजाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेतून बाद करण्यासाठी बाबासाहेबांच्या पश्चात त्यांची बदनामी करण्यात आली. तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांनी केलेलं भयंकर षडयंत्र होतं, असा आरोप त्यांनी केला. 'आम्ही पँथर्सनी माईंना पुन्हा सन्मानानं जनतेत आणल्यानंतर १९८० च्या दशकात ब्राहण द्वेषाची चळवळ चालवण्यासाठी काही लोकांनी माईंना खलनायक ठरवणं गरजेचं मानलं, असंही गायकवाड म्हणाले.

'गैरसमजांना बळी पडलेल्या बौद्ध समाजाच्या हातून माईंच्या बाबतीत घोर अपराध घडला. स्वतः एकेकाळी बहिष्कृत असलेल्या समाजानंच ब्राह्मण असलेल्या आपल्या उद्धारकर्त्याच्या पत्नीलाच बहिष्कृत करून टाकले! त्या अन्यायाचं परिमार्जन माईंचा अर्धाकृती पुतळा चैत्यभूमीवर उभारून आपण आता केले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. 

कोल्हापुरात आता १० दिवस जंगी शाही दसरा महोत्सव; सरकारकडून निधीची घोषणा

बाबासाहेब आणि माईंचं नातं हे एक बौद्धिक- वैचारिक मनोमिलन होतं. आपल्या आयुष्याची आठ वर्षे वाढण्याचं श्रेय खुद्द बाबासाहेबांनी माईंना दिलेलं आहे. तरीही त्यांच्यावर संशय घेणारे टिकोजीराव कुठून उपटले, असा सवाल त्यांनी केला. यापुढं माईसाहेब यांच्या बदनामीची मोहीम आंबेडकरी समाजानं सहन करता कामा नये, असंही गायकवाड म्हणाले.

माई सर्व लढ्यामध्ये अग्रभागी होत्या!

पँथर्सनी पुन्हा समाजात आणल्यापासून बौद्धांच्या सवलती, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, रिडल्स, रमाबाई कॉलनीतील दलितांचे हत्याकांड अशा सर्व लढ्यामध्ये माई अग्रभागी राहिल्या. बाबासाहबांच्या पश्चात त्यांनी आंबेडकरी समाजाला अखेरपर्यंत साथ दिली, असं प्रा. अविनाश कोल्हे यांनी सांगितलं.

दलितांचा मूकनायक हा भारताचा भाग्य विधाता बनण्याची प्रक्रिया बाबासाहेब यांच्या जीवनात माईंनी पदार्पण केल्यानंतर घडली आहे. या कालखंडातच संविधान तसेच बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची निर्मिती झाली. माईंच्या भक्कम आधारामुळंच ही कामगिरी बाबासाहेबांना शक्य झाली, असं कवी अरुण म्हात्रे म्हणाले.

मुंबईत जेलमध्ये बंद महिला कैद्यांना ‘टेन्शन फ्री’ ठेवतय ‘हे’ खास FM Radio station

या परिसंवादात प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे, प्राचार्य डॉ. मिलिंद तायडे, प्रभाकर ओव्हाळ यांचीही ' सूर्यप्रभा ' या ग्रंथावर समिक्षापर भाषणे झाली. या ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी प्रास्ताविक केलं. तर, लेखिका वैशाली भालेराव यांनी सूत्र संचालन केलं.

या जयंती समारंभाला संशोधक विजय सुरवाडे, ज्येष्ठ कवी शिवा इंगोले, समीक्षक अरविंद सुरवाडे, राजकीय विश्लेषक सुनील कदम, श्रीकांत तळवटकर, नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp channel